

वडूज : वृध्देच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी वडूज येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुशीला दादू ननावरे (रा.अंभेरी,ता.खटाव) असे मृत वृध्देचे नाव आहे. प्रशांत उर्फ संतोष विश्वनाथ ननावरे (रा. अंभेरी ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतच्या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, दि. 2 सप्टेंबर 2018 रोजी पाच वाजण्याच्या सुमारास अंभेरी येथील विमल बळीराम क्षीरसागर यांच्या घरासमोर सुशिला ननावरे या कोंबड्या राखत बसल्या होता. त्यावेळी प्रशांत ननावरे याने त्यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याचा गुन्हा औंध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सपोनि सुनील जाधव, पोलिस नाईक डी. वाय. देवकुळे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवत तपास करून आरोपीविरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने 12 साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी आरोपी प्रशांत ननावरे याला दोषी ठरवून जन्मठेप व 10 हजार रूपये दंडाची तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, औंध पोलिस ठाण्याचे सपोनि अविनाश यांनी मार्गदर्शन केले. त्यांना प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलिस हवालदार जयवंत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस हवालदार अमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.