

सातारा: शहराजवळ वाढे फाटा येथे सातारा तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत दोन बेकायदा बंदूक जप्त करत तिघांना अटक केली. संशयित तिन्ही युवक अंबवडे ता.कोरेगाव, मेढा, ता.जावली व करंजे ता. जावली येथील आहेत. दरम्यान, पोलिसांनी बंदूका व दुचाकी असा 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. राज धनाजी घाडगे (वय 19, रा.आंबवडे ता.कोरेगाव), ओंकार सोमनाथ साखरे (वय 26, रा. मेढा), गणेश विष्णूदास धनावडे (वय 32, रा. करंजे दोन्ही ता.जावली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांची चोख गस्त सुरु आहे. दि.17 रोजी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोनि निलेश तांबे यांना वाढेफाटा येथे एकजण बंदूक घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ दुचाकीवर असलेल्या संशयित युवकाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले.
पोलिसांनी संशयिताकडे बंदूकीबाबत विचारणा केल्यानंतर तो निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ते पिस्टल मित्राकडून आणले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या संशयिताची माहिती घेवून त्याला ताब्यात घेतले असता ते पिस्टल कुठून आणले याची चौकशी सुरु असतानाच आणखी एका संशयिताचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तिसऱ्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडेही आणखी एक पिस्टल सापडले. अशाप्रकारे सातारा तालुका पोलिसांनी 60 हजार रुपये किंमतीची एकूण दोन पिस्टल व दुचाकी असा 1,20,000 रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडूकर पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे, फौजदार सोनू शिंदे, पोलिस दादा स्वामी, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, राजू शिखरे, प्रदिप मोहिते, मालोजी चव्हाण, संदिप आवळे, सतीश बाबर, प्रविण वायदंडे, सुनिल भोसले यांनी कारवाई केली.