Satara Crime: बेकायदा लाकुडतोड प्रकरणी दोघांवर गुन्हा; लाकडांसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
पाटण : बेरफळे (ता. पाटण) गावच्या हद्दीत विनापरवाना बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून लाकूड ट्रकमध्ये भरत असताना पाटणच्या वनविभागाने कारवाई केली. शेतकऱ्यासह वाहन चालकावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ट्रक, क्रेन व लाकूड असा सुमारे 7 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, गुरुवार दि. 6 रोजी पाटण वनपरिक्षेत्रात कराड-चिपळूण राज्यमार्गावरील मौजे येरफळे गावच्या हद्दीत विनापरवाना बेकायदेशीरपणे क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये लाकूड भरण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी अचानक धाड टाकली.
त्यावेळी सदर ट्रकमध्ये आंबा, ऐन, जांभूळ, पळस, शिरस, रेट ट्री आदी प्रजातीच्या लाकडाचा मुद्देमाल मिळून आला. यावेळी केलेल्या कारवाईत ट्रक (क्र. एमएच 11 ए एल 4021), क्रेन (क्र. एमएच 50 एल. 6962) व लाकूड माल असा एकूण 7 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ट्रक चालक प्रदीप चंद्रकांत पवार (वय 40, रा. कोकिसरे, ता. पाटण), क्रेन चालक व शेतकरी किसन कोंडीबा पडवळ (70, रा. येरफळे, ता. पाटण) यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरदची कारवाई साताराच्या वनसंरक्षक जयश्री जाधव, उपसंरक्षक साताराचे अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, मल्हारपेठचे वनपाल ठोंबरे, वनरक्षक संतोष यादव यांनी केली. अधिक तपास मल्हारपेठचे वनपाल करत आहेत.

