

शिखर शिंगणापूर : शिंगणापूर येथील बळीपवस्ती परिसरातील डोंगरभागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास मानवी कवटी आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर दहिवडी पोलिसांच्या तपास पथकाने सलग दोन दिवस शिंगणापूर डोंगर परिसर पिंजून काढत शोध घेतला. मात्र अद्यापपर्यंत याप्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती लागले नसल्याने आढळून आलेल्या मानवी कवटी प्रकरणाचे गूढ कायम आहे.
शिंगणापूर येथील बळीपवस्ती परिसरातील डोंगरात 15 ते 20 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीची मानवी कवटी आढळून आली. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून नेमका हा प्रकार काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मानवी कवटी आढळून आल्यानंतर याबाबतची आकस्मित मृत्यूची नोंद दहिवडी पोलिसात झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत.
पोलिस उपाधीक्षक रणजीत सावंत, सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांच्यासह 15 ते 20 पोलिसांच्या पथकाने कवटी आढळून आलेला बळीपवस्ती तसेच मंदिर डोंगर परिसर पिंजून काढला. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही अन्य मानवी अवयव अगर इतर धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
यात्रा कालावधीत मृत्यू झाल्याचा अंदाज..
शिंगणापूर परिसरात बेवारस मानवी कवटी आढळून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा होती. त्यामुळे यात्राकालावधीत सदर बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांसह पोलिसांकडूनही व्यक्त होत आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा कालावधीत कोणी व्यक्ती अगर भाविक बेपत्ता झाले असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन दहिवडी पोलिसांनी केले आहे.