

सातारा : सातारा जिल्ह्यातील निरा-लोणंद रोडवर शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांकडून पोलिसांनी 6 पिस्टल, 30 गोळ्या, 6 मॅग्झीन असा शस्त्रांचा साठा जप्त केला. संशयित दोघे मोक्कासारख्या गुन्ह्यात जामिनावर असून तडीपारीची कारवाई असतानाही जिल्ह्यात ते शस्त्रेे घेऊन फिरत होते.
अमित ऊर्फ बिर्या रमेश कदम (वय 32, रा. लोणी, ता. खंडाळा), विशाल महादेव चव्हाण (वय 30, रा. भोळी, खंडाळा, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोक्का अंतर्गत जामीनावर सुटलेले व जिल्ह्यातून तडीपार असलेल्या दोघेजण एमएच 12 टीएस 1889 या कारमधून निरा ते लोणंद रस्त्यावरुन जाणार असून ते शस्त्रे विक्री करणार असल्याचे समजले. त्यानुसार सातारा एलसीबी पोलिसांनी सापळा लावला.
पोलिसांनी निरा-लोणंद रस्त्यावरील रेल्वे पुलावर संबंधित कार अडवली. यावेळी संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरले व ताब्यात घेतले. तसेच कारमध्ये असलेला 6 देशी बनावटीची पिस्टल, 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकूण 15 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयितांकडून जप्त केला. लोणंद पोलिस ठाण्यात संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातीर, विश्वास शिंगाडे, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर तसेच लोणंद पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्याचा कार्यभार घेऊन अवघे 15 दिवस झाले आहेत. सातारा जिल्हा बंदूक, गोळ्या खरेदी-विक्रीचा हब होत चालला आहे. त्याला अंकुश लागावा, यासाठी दोशी यांनी क्राईम मिटिंगमध्ये सर्व पोलिसांना सक्त सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शस्त्रांचा अक्षरश: साठाच जप्त केला. एकाचवेळी एवढ्या प्रमाणात शस्त्रे सापडल्याने गेल्या अनेक वर्षांतील ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे. दरम्यान, एलसीबी याच्या मुळाशी जाऊन ती शस्त्रे कुठून आणली? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आतापर्यंत शस्त्रेे कोणाला विकली गेली? पोलिस याचा उलगडा करणार का, याकडे लक्ष लागले आहे.