

वाई : वाई परिसरात गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी अटक केली. सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे असा १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी दुपारी प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना शेंदुरजणे गावच्या हद्दीत वाई-सुरूर रस्त्यावरील कॅनॉलजवळ एक युवक पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन पंचांसह सापळा रचला. सायंकाळी सुदेश पाटणे हा संशयितरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल मिळून आले. चौकशीत हे पिस्तूल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान अक्षय देसाई यानेही स्वप्निल जगताप याच्याकडून पिस्तूल घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा अक्षय हा परखंदी रोड चौकात आढळला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलिस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, विक्रम धोत्रे, विशाल शिंदे, नितीन कदम, हणमंत गाडे आणि महिला पोलिस नाईक प्रियांका कदम यांच्या पथकाने कारवाई केली.