

सातारा : शिवथरच्या (ता. सातारा) हद्दीत गोवाहून इंदौरकडे निघालेला दारूचा कंटेनर तालुका पाेलिसांनी पकडला. मॅगीच्या बाॅक्सच्या आडून दारूच्या बाटल्या सापडल्या. सुमारे २ कोटी रुपये त्याची किंमत असून, पोलिसांनी केलेली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी आहे. जप्त दारूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जाणार आहे.
प्रेमकुमार जनकधारी सिंग (वय ५८, रा. कोलकाता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुसरा संशयित दिल्ली येथील असून, त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई १९ जुलै राेजी झाली. गोपनीयचे पोलिस महेंद्र नारनवर यांना अशी माहिती मिळाली की, दारूचे बॉक्स भरून कंटेनरची सातारा तालुक्यातून वाहतूक होत आहे. त्यांनी पोनि नीलेश तांबे यांना ही माहिती दिल्यानंतर गोपनीय व गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांचे पथक तयार केले. पोलिसांनी शिवथर येथील रस्त्यावर सापळा लावला.
तालुका पोलिसांना आरजे १४ जीआर ०५३९ या क्रमांकाचा कंटेनर दिसताच तो थांबवला. कंटेनरमध्ये मॅगीचे बॉक्स दिसले. मात्र, दारूसारखा वास त्यातून येत होता. पोलिसांनी बॉक्स बाजूला केले असता, कंटेनर भरून दारूचे बॉक्स असल्याचे स्पष्ट झाले. संशयिताने दारू वाहतूक करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ कोटी ५७ लाखांची दारू व कंटेनर असा २ कोटींचा मुद्देमाल जप्त केला.