

कराड : वाद सुरू असताना रागाच्या भरात भाच्यानेच मामाचा कायमचा काटा काढल्याची घटना हजारमाची (ओगलेवाडी, ता. कराड) परिसरात घडली. गुरुवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाल्यानंतर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मामाचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू होती.
शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (वय 31, रा. हजारमाची) असे खून झालेल्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओगलेवाडी (हजारमाची) परिसरात कराड-विटा मार्गावरील मुख्य चौक परिसरात शेखर ऊर्फ बाळू सूर्यवंशी आणि त्याचा भाचा या दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादावेळी चिडून अचानकपणे भाच्याने चाकूने मामा शेखरवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला होता. जखमीला कराडमधील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र सायंकाळी शेखरची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्याला मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयात हलविले होते.
मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी रुग्णालयात धाव घेत माहित घेतली. रात्री 9 नंतरही पंचनामा तसेच प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही कराड शहर पोलिसांकडून सुरू होती.