

आदेश खताळ
सातारा : सातारा जिल्ह्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध वितरकांच्या स्वत:च्या इन हाऊस लॅब असून भेसळ लपवण्यासाठी खोटे रिपोर्ट दिले जात असल्याचे समोर आले आहे. या अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये दूध संघ किंवा दूध वितरक आपल्याच दुधाची तपासणी आपल्याच प्रयोगशाळेत करतात. त्याचे अहवाल त्यांचेच कर्मचारी तयार करतात आणि दूध शुद्ध असल्याचे प्रमाणीकरण करतात. अनेक वर्षांपासून हा गोलमाल सुरू आहे. दूध संघाच्या इन हाऊस प्रयोगशाळांमधील बनावट अहवाल हितसंबंधातून तयार केले जात असल्याने अन्न व औषध प्रशाासन तपासणी करणार का? असा सवाल केला जात आहे.
दूध संघ व खाजगी दूध वितरकांकडील इन हाऊस प्रयोगशाळांमध्ये दुधाचे फॅट, सीएनएफ, बॅक्टोरियल काऊंट, भेसळ आदि चाचण्या केल्या जातात. ही प्रयोगशाळा दूध डेअर्या (दूध संकलन केंद्र) व चिलिंग सेंटर्स (दूध शितकरण केंद्र) यांच्याकडून आलेल्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी असते. मात्र प्रत्यक्षात या प्रयोगशाळांचा वापर दुधातील भेसळीवर पांघरूण घालण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. कारण या प्रयोगशाळा दूध संघाच्या मालकीच्या असून त्यांचेच पगारदार कर्मचारी या प्रयोगशाळेत आलेल्या दुधाची तपासणी करतात. दूध संघ व खाजगी दूध वितरकांच्याच नियंत्रणाखाली या प्रयोगशाळेतील दुधाची तपासणी केली जात असल्याने विरोधात अहवाल दिले जात नाही. खरा अहवाल देण्याची शक्यताच नसल्याने या प्रयोगशाळा फक्त नावालाच आहेत.
याच प्रयोगशाळांच्या माध्यमातून बनावट दुधाचा खेळ चालतो. तपासणीसाठी घेतला जाणारा दूधाचा नमुना हा प्रत्यक्ष ग्राहकांना वितरित होणार्या दुधातून घेतला जात नाही, तर तो दुधाच्या शुद्ध नमुन्यातून घेतला जातो. खराब किंवा भेसळयुक्त दूध वेगळे ठेवायचे व तपासणीसाठी शुद्ध दुधाचा नमुना द्यायचा आणि अहवाल 'ओके' द्यायचा असा खेळ या प्रयोगशाळांच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रयोगशाळांकडून अहवलात प्रचंड घोटाळे केले जातात. दुधातील फॅट व एसएनएफ प्रमाण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरेटि ऑफ इंडिया (एफएसएसएआय) यांच्या मानकांपेक्षा कमी असले तरी कागदावर मानकानुसार आकडे भरले जातात. उपकरणे अचूक असली तरी नोंदवहीमधील माहिती सोयीनुसार भरली जाते. दुधातील बॅक्टेरियल काउंट लपवला जातो. दूधाच्या टाक्यांची स्वच्छता न करता अस्वच्छ टाक्यांच्या वापरातून त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतो. हा बॅक्टेरियल काउंट मानकापेक्षा कित्येक पट जास्त असतो. मात्र अहवालात मात्र 'विथिन लिमिट' असे नमूद केले जाते. काही दूध संघ व खाजगी दूध वितरकांकडे अशा प्रयोगशाळाही नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याठिकाणी भेसळीचा किती उच्छाद सुरू असू शकतो, याची कल्पना येते.
अनेक दूध संघ व खाजगी दूध वितकरांकडील तपासणी उपकरणे वर्षानुवर्षे कॅलिब्रेट केलेली नसतात. त्यामुळे चुकीचे रिडिंग येते. मात्र उपकरण बरोबर आहे असे दाखवले जाते. तारखांमध्येही बदल केला जातो. जुन्या, चांगल्या दुधाचे अहवाल नव्या व भेसळयुक्त दुधासाठी वापरले जातात. यामध्ये फक्त तारीख बदलली जाते बाकी सगळी माहिती 'कॉपी पेस्ट' केली जाते. (क्रमश:)