

महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांना हॉटेलच्या खोल्या मिळवून देण्याचा (कॅनव्हासर) व्यवसाय करणाऱ्यांमध्ये हॉटेल रूम देण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यातून घावरी येथील उपसरपंच विजय सकपाळ हे जखमी झाले. त्यांच्यावर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाबळेश्वर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला विजय सकपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी थांबवून राहण्यासाठी हॉटेलविषयी विचारणा केली. त्यांनी आपला संपर्क क्रमांक पर्यटकांना देऊन रूम लागल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर पर्यटक पुढे निघून गेले.
काही वेळाने तेच पर्यटक बाजारपेठेकडे येत असताना दुचाकीवरून आलेले कॅनव्हासर अजमुद्दीन व अमजद वलगे यांनी पर्यटकांना हॉटेल रूमसाठी विचारणा केली. याचवेळी विजय सकपाळ व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. पर्यटकांना रूम देण्यावरून वलगे व सकपाळ यांच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली. या किरकोळ वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या भांडणात विजय सकपाळ जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच घावरी गावातील ग्रामस्थांसह विजय सकपाळ यांचे मुंबईस्थित नातेवाईक रविवारी थेट मारहाण करणाऱ्या युवकांच्या मालुसर गावी दाखल झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याबाहेरही मोठी गर्दी झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांची घावरीच्या ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी मारुती जाधव, प्रकाश सकपाळ, किरण सकपाळ, किसन जाधव, तानाजी सकपाळ आदी उपस्थित होते. संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची ग्वाही पोलिसांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. या वादातून झालेल्या हाणामारीची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.