

सातारा : सातार्यातील यादोगोपाळ पेठेत तुळजाभवानी कॉम्प्लेक्समधील (अपार्टमेंट) गाळ्यामध्ये मटका, चक्री जुगार, कॅरम गेमसह दारुचे दुकानही थाटल्याने रहिवासी संतप्त बनले. बुधवारी महिला-पुरुषांनी पोलिस मुख्यालय गाठून पोलिस अधीक्षकांकडे ‘आम्हाला वाचवा’ असे म्हणत कैफियत मांडली. सातार्यातील या घटनेने ‘आ..रा..रा संबंधितांवर कोणाचा वरदहस्त, परवानगी कोणी दिली?’ असा सवाल उपस्थित झाला आहे.
यादोगोपाळ पेठेत तुळजाभवानी हे मोठे अपार्टमेंट आहे. यामध्ये सुमारे 65 फ्लॅटधारक व 8 गाळे आहेत. यातील रहिवाशांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक गाळे भाड्याने दिले गेले आहेत तर काही गाळ्यांची विक्री झाली आहे. या गाळ्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मटका, चक्री जुगार, कॅरम गेम असे अवैध धंदे सुरु आहेत. यामुळे कॉम्प्लेक्समध्ये राहणार्या नागरिकांना प्रामुख्याने महिला, मुलींना सर्वाधिक त्रास होत आहे. गाळे भाड्याने देताना ते कोणत्या व्यवसायासाठी वापरले जाणार आहेत? हे तपासूनच गाळे दिले जावेत असे रहिवाशांनी गाळा मालकांना सांगितले होते. मात्र त्याकडे संबंधितांनी कानाडोळा केला.
सातार्यात तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये बिनधोकपणे मटका सुरु असताना गेल्या 15 दिवसांपूर्वी मात्र गाळ्यामध्ये दारुचे दुकानही थाटण्यात आले आहे. पहिला मटका धंद्याचा मनस्ताप असतानाच आता दारुचे दुकान थाटल्याने रहिवासी संतप्त बनले. बुधवारी हे सर्व फ्लॅटधारक एकत्र आले व त्यांनी थेट सातारा पोलिस मुख्यालय गाठले. पोलिस अधीक्षक यांना भेटून रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये कसा गोरख धंदा सुरु आहे, हे कथन केले. तत्काळ सर्व अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा पुढील परिणामाला प्रशासन जबाबदार राहिल, अशी संतप्त भूमिका रहिवासी नागरिकांनी व्यक्त केली.
दारुड्यांकडून लघुशंका, सिगारेटीच्या धुरकांड्या
कॉम्प्लेक्समध्ये महिला, युवती, लहान मुले आहेत. मटका धंद्यामुळे लोक रस्ता बदलून जात होेते. आता दारुचे दुकान झाल्याने दारुडे दारु घेवून तिथेच परिसरात ढोसत आहेत. दारु पिल्यानंतर कॉम्प्लेक्स परिसरात लघुशंका करत आहेत. याशिवाय सिगारेट ओढत थांबत आहेत. यामुळे महिलांची सुरक्षितताच धोक्यात आली असल्याचे महिलांनी सांगितले.