Satara Crime : मार्डीत वृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

घटनेमुळे मार्डी परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध दांपत्यावरील हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट
Satara Crime : मार्डीत वृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी
Published on: 
Updated on: 

शिखर शिंगणापूर : माण तालुक्यातील मार्डी येथील पवारवाडी शिवारात सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात साळूबाई मारुती पवार (वय ६७) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे पती मारुती शंकर पवार (वय ७५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मार्डी परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध दांपत्यावरील हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्डी ता. माण येथील पवारवाडी येथील शिवारात मारुती शंकर पवार व साळूबाई मारुती पवार हे वृद्ध दांपत्य वास्तव्यास होते. सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या वृद्ध दांपत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहाय्यक फौजदार मोहन हांगे यासह मार्डीचे पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी यांना घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी अज्ञात हल्लेखोराने वृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनेनंतर साळूबाई पवार या घरामागील शेतात मृतावस्थेत आढळून आल्या, तर त्यांचे पती मारुती पवार हे घरातच गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी जखमी मारुती पवार यांना तातडीने पुढील उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान या हल्ल्यानंतर मार्डीचे पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मार्डी परिसरात खळबळ उडाली असून हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्या पवारवाडी तसेच मार्डी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच स्थानिक पोलिसांचे पथक तैनात असून पोलीस अज्ञात हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news