

लोणंद : लोणंद येथील देशी दारूच्या दुकानात मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरज दिलीप जाधव (वय 30, रा. शास्त्री चौक, लोणंद) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 10 रोजी सायंकाळी लोणंद येथील एका दारूच्या दुकानात सुरज हा त्याचे मित्र भगवान श्रीरंग शेळके (रा. पानमळा, निंबोडी, ता. खंडाळा), अनिरुद्ध पुरुषोत्तम चांगण (रा. सुदर पॅलेस, लोणंद),संपत भागुजी शेळके, सूर्यकांत शेळके, सचिन नाना शेळके व प्रविण शेळके (सर्व रा. निंबोडी) यांच्यासोबत दारू पित होता. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून सुरज जाधव याला मित्रांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर सुरज जाधव हा रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, शवविच्छेदनासाठी मृतदेह लोणंद ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी शरीरावरील जखमा पाहून मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार केली. त्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात डोक्यातील अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत सुरज जाधव यांची आई सौ. सुनंदा दिलीप जाधव यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित भगवान श्रीरंग शेळके व अनिरुद्ध पुरुषोत्तम चांगण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.