

दहिवडी : माण तालुक्यातील कुळकजाई येथे झालेल्या रमेश मारुती इंगळे (वय 53) यांच्या खुनाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे. दहिवडी पोलिस व सातारा स्थानिक गुन्हे अनवेषण शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. दारूच्या नशेत जाता येता शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरुन खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शुभम दत्तात्रय चव्हाण (वय 29, रा. कुळकजाई) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी सखाराम शिपटे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून गावातील रमेश इंगळे हे विवस्त्र अवस्थेत बौद्ध स्मशानभूमीजवळील शेतात मृतावस्थेत आढळून आल्याचे कळवले. ही माहिती मिळताच सपोनि दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती घोंगडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
पाहणीदरम्यान मयताच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत मयताची पत्नी रेश्मा रमेश इंगळे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासा दरम्यान दहिवडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे शुभम चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच रमेश इंगळे यांचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. त्याने रमेश इंगळे यांनी मद्यप्राशनानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून खून केल्याचे सांगितले.
ही कारवाई सपोनि दत्तात्रय दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती घोंगडे, पोलिस हवालदार श्रीनिवास सानप, विजय खाडे, नितीन धुमाळ, संभाजी खाडे, पुनम रजपूत, चंद्रकांत शिंदे, निलेश कुदळे, मल्हारी खाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रोहित फारणे, मनोज जाधव, लैलैश फडतरे, लक्ष्मण जगदने, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, अमित माने, अजय जाधव, अमित झेंडे, स्वप्नील दौंड, रविराज वणे यांनी केली.