

दहिवडी : माण तालुक्यातील दहिवडी-मायणी मार्गावर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येणारा विदेशी व देशी दारूचा साठा जप्त केला. यामध्ये सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोन जणांना अटक केली.
18 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयासमोर दहिवडीकडून मायणीकडे जाणारी पांढऱ्या रंगाची ओमनी (क्र. एमएच 11 सीक्यू 1322) संशयावरून थांबवली. तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. याप्रकरणी वाहनचालक पांडुरंग बाळू जाधव (वय 45, रा. लाडेगाव, ता. खटाव) याची चौकशी केली असता, हा दारूसाठा संदीप श्रीकांत कुंदप ( 38, रा. पुसेसावळी, ता. खटाव) याचा असल्याचे समोर आले. दोघेही बेकायदेशीररीत्या दारू विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत 1 लाख 75 हजार रुपये किमतीची ओमनी गाडी तसेच सुमारे दीड लाख रुपये किमतीची देशी व विदेशी दारू असा एकूण 3 लाख 13 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. ए. खाडे करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक डी. पी. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.