

सातारा : सातारा एमआयडीसी परिसरात बंदूक विक्री करण्यासाठी आलेल्या नासीर अब्दुलकरीम बागवान (वय 49, रा. सोमवार पेठ, सातारा) याला शहर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त केली.
अधिक माहिती अशी, सातारा परिसरात पिस्टल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सातारा शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक वॉच ठेवून होते. एमआयडीसी परिसरात एकजण संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवले. तेव्हा संशयिताकडे पिशवी होती. पोलिसांनी त्यामध्ये पाहणी केली असता गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतुसे होती. पोलिसांनी बंदूक जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले. बंदूक, काडतुसे, मोबाईल असा 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने बंदूक विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितलेे. पोलिसांनी संशयितावर आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, संतोष घाडगे, तुषार भोसले, सचिन रिटे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.