

मेढा : जावली तालुक्यातील आर्डे गावात शेतमजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरुन घरात घुसून एका मजुराचा निर्घृण खून करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी गावातीलच आठ जणांविरोधात मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगतराव बाबुराव जाधव (वय 57) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, अदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओंकार विलास जाधव, विलास शामराव जाधव, अश्विनी दिपक जाधव व सुनिता विलास जाधव (सर्व रा.आर्डे ता.जावली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सविता आगतराव जाधव (वय 50) यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली आहे. तक्रारदार या शेतमजुरीचे थकीत पैसे मागण्यासाठी संशयित अश्विनी जाधव व सुनिता जाधव यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी पैशाच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. यात महिलेला शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारी घडलेल्या या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी आपापसात संगनमत करून सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार यांच्या घरावर हल्ला चढवला.
संशयितांनी घरात घुसून आगतराव जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. तसेच काठ्या व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मेढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. खूनाच्या घटनेमुळे आर्डे गावात तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि सुधीर पाटील करत आहेत.