

खटाव : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन निर्घृण खून केल्याची घटना खटाव तालुक्यातील कटगुण येथे बुधवारी दुपारी घडली. पिंकी विनोद जाधव (वय 21, रा. कटगुण, ता. खटाव) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित विनोद विजय जाधव (वय 26) हा स्वतः पुसेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. ही माहिती सपोनि संदीप पोमण यांनी दिली.
पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटगुण येथील विनोद जाधव हा बुधवारी दुपारी एक वाजता पुसेगाव पोलिस ठाण्यात आला. त्याने काही वेळापूर्वी त्याची पत्नी पिंकी जाधव हिला गोसावी वस्ती येथे चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात गज मारला असून, ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. सपोनि संदीप पोमण व सहकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने तत्काळ पिंकी जाधव हिला उपचारासाठी पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पिंकीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. संशयित विनोद जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव दाम्पत्याला तीन चिमुकली मुले आहेत.