

सातारा : सातार्यातील शाहू चौकातील ‘डंका’ पाणीपुरीच्या सेंटरवर सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याशी दोघांची झटापट झाल्याच्या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हॉटेल चालक व संशयितांमध्ये राडा होत धुमश्चक्री सुरू असतानाच आरडीसींचीही गचांडी धरली गेल्याने एकच गोंधळ उडाला.
स्वत: आरडीसींनी आपणाला मारहाण झाली नसून झटापट झाल्याचा खुलासा केला आहे. ‘डंका’ येथील सीसीटीव्हीत घडलेला सर्व प्रकार दिसत असल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सातार्यासह राज्यात सुरू झाली आहे. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
करण शशिकांत कदम (वय ३३, रा. दौलतनगर, सातारा) यांनी सुहास विलास साळुंखे व अनोळखी त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणात सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनीही पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.
नागेश पाटील यांना मारहाण झाल्याची राज्यभर बोंबाबोंब.....
गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सोशल मीडियावर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना पाणीपुरीवरून मारहाण झाल्याची बातमी व्हायरल झाली. जिल्ह्यात अनेकांच्या स्टेटसवर व सोशल मीडियाच्या ग्रुपवर नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त झळकत होते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्यातून सातार्यात ‘नेमकं काय झालंय’ अशी विचारणा करणारे फोन येत होते. वस्तुस्थिती समोर येत नसल्याने काही जिज्ञासूंनी ‘डंका’ या पाणीपुरीच्या दुकानात जाऊन सीसीटीव्हीतील दृश्ये पाहिली. त्यात बराच काळ सुरू असलेला हा गोंधळ अनेकांना दिसला.
स्वत: नागेश पाटील यांनी मात्र आपल्याला मारहाण झाली नसल्याचे व फक्त झटापट झाल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हिंसक प्रकार थांबावा, यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन वाद मिटवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा नागेश पाटील यांनी केला आहे.