Satara Crime: मटका, जुगार व चक्रीने सातारा बेजार

नेटच्या जाळीआड बेकायदा धंदे; पोलिसांचे हात ओले होत असल्याचा आरोप
Satara Crime
Satara Crime: मटका, जुगार व चक्रीने सातारा बेजारPudhari
Published on
Updated on
विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात खुलेआम मटका सुरू असून दिवसेंदिवस जुगाराच्या टपऱ्यांमध्ये वाढच होत आहे. चक्री या नवीन जुगाराने सातारा वेढला असून तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे सातारकर बेजार होत आहेत. पोलिसांचे हात ओले होत असल्याने कारवाईचा फुग्याप्रमाणे केवळ बुडबुडा दाखवला जात आहे. यातूनच दादा, भाईंना आर्थिक पाठबळ मिळत असल्याने गुन्हेगारी फोफावत चालली आहे.

जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटक्याचा धंदा जोमाने सुरु आहे. कोणीतरी दादा, भाई खादीशी संधान साधतो आणि खाकीची सेटलमेंट करून जुगाराच्या टपऱ्या वाढवतो. गुन्हेगारीचा हा नवा पॅटर्न साताऱ्यात फेमस झाला आहे. या टपऱ्यांना नेटचे जाळे हमखास असते. ज्याप्रमाणे दारूचे दुकान, बिअर शॉपची गर्दुल्यांना माहिती असते, त्याप्रमाणे टपरीला जाळी गुंडाळली आहे म्हणजे तिथे मटका सुरू आहे, असे समीकरण जुगारबाजांचे झाले आहे. चौकाचौकात, अडगळींच्या प्रत्येक ठिकाणी, अगदी सार्वजनिक ठिकाणी देखील मटका, जुगाराच्या टपऱ्या साताऱ्यात आहेत. बांधीव टपरी टपरींमध्ये जुगाराचा हा धंदा खुलेआम चालतोच कसा? असा प्रश्न सातारकरांना पडलेला आहे.

चक्री या नव्या जुगाराने साताऱ्याला वेढले आहे. कॉम्प्युटरवर हा धंदा तेजीत चालत आहे. चक्री या जुगारामध्ये प्रामुख्याने तरुण पोरं गुरफुटून गेली आहेत. सातारा शहरात तसेच महामार्गावर काही महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या चार वर्षात चक्रीचे स्तोम कमालीचे फोफावले आहे. खाकीला या सर्व बाबी माहित आहेत. मात्र, मंथली हात ओले होत असल्याने ‌‘तेरी भी चूप, मेरी भी चूप‌’ होत आहे. चार-सहा महिन्यात मग अचानक जुगार धंद्यांसाठी पोलिसांकडून ड्राईव्ह राबवला जातो. यावेळी पाच-दहा ठिकाणी कारवाई दाखवल्या जातात. परत दुसऱ्या दिवसापासून पुन्हा जुगार धंद्याची जैसे थे परिस्थती होत आहे.

स्टँडमध्ये चालक, कंडक्टरही गुंतले

सातारा एसटी स्टँडमध्ये मुख्य रस्त्यालगत जुगाराचा अड्डा सुरू आहे. भुलभुलैया असल्याप्रमाणे या अड्ड्याला देखील नेटची जाळी पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जुगाराच्या या गर्तेत अनेक एसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर तसेच एसटी स्टँडमध्ये असलेले किरकोळ विक्रेते जुगारामध्ये गुंतले आहेत. अनेक बहाद्दर या अड्ड्याचे फिक्स ग्राहक आहेत. जुगाराच्या या भानगडीत अनेक चालक, वाहकाचे दिवाळं निघाले आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कर्जाचे, उसन्या पैशाचे ओझं वाढत आहे. पण लक्षात कोणीच घेत नाही, हे दुर्दैव आहे.

राजमाने पॅटर्नची गरज

साताऱ्यात 2018 साली डीवायएसपी गजानन राजमाने यांची साडेतीन महिन्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. मटका, जुगार कारवाईत ते स्वत: जुगार धंद्याचे शेड, पत्रे, लाकडी बांबू, खुर्च्या, टेबल जप्त करत होते. तसेच जुगारबाजांनी मोबाईलचा वापर केल्याने आयटीसारखे कलम ठोकत होते. यामुळे जुगारबाजांना जामीन मिळत नव्हता. डीवायएसपी राजमाने यांच्यानंतर ही धमक कुठल्याच अधिकाऱ्याने दाखवली नाही. यामुळे सातारा पोलिस जुगार धंद्यासाठी लेचीपेची कारवाई करणार की धमक दाखवणार? याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news