

सातारा/भुईंज : भुईंज (ता. वाई) परिसरातील सराईत चौघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी कारवाईचा दणका देत तडीपार केले. सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मयूर शिवाजी भोसले (वय 20, रा. खालचे चाहुर, भुईज), संदीप सुरेश पवार (24 रा. भुईज), विशाल सुभाष भोसले (23, विराटनगर, पाचवड), अमर विलास माने (19, रा. विराटनगर, पाचवड, सर्व ता. वाई) असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील मयूर भोसले हा टोळीचा म्होरक्या आहे.
संशयित टोळीवर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ दमदाटी करुन दुखापत करणे, चारचाकी-मोटार वाहन पेटवून देणे असे गंभीर स्वरूपाचे भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी संशयित टोळीला वेळोवेळी अटक करुन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. मात्र या टोळीने गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या होत्या.
टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे वाई तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य जनतेतून या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. टोळीवर प्रभावी कारवाई व्हावी यासाठी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे यांनी प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षकांकडे पाठवला.
हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुनावणी घेवून चौघांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले. दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुध्द तडीपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.