

पाचगणी : जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी जवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील एका बंगल्यावर ‘गायिका’ आणि ‘महिला वेटर’च्या नावाखाली बारबालांना नाचवल्याचा अश्लिल प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी ‘वर्षा व्हिला’ या बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकून हॉटेल मालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत 18 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पाचगणीत खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे ‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर धाड टाकण्यात आली.
पहाटे टाकलेल्या या छाप्यात बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये सहा बारबाला काही गिऱ्हाईकांसमोर अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले. काही महिलांनी गिऱ्हाईकांशी लगट करून नाचल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले तर बंगल्याच्या मालकासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी साऊंड सिस्टीम, मोबाईल, डिव्हीआर आणि कार असा एकूण 18 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सपोनि दिलीप पवार, सहायक फौजदार कैलासनाथ रसाळ, पोलिस हवालदार श्रीकांत कांबळे, विठ्ठल धायगुडे, उमेश लोखंडे, व्ही. यू. नेवसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रुती गोळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.