

सातारा : सातारा शहरातील जगताप कॉलनी परिसरात गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) सापळा रचून अटक केली. तेजस अशोक काळे (वय २७, रा. कोडोली, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल असा ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुरुवारी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत जगताप कॉलनीतील मोकळ्या मैदानात एक तरुण गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संबंधित तरुण मैदानात येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल हँडसेट आढळून आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातीर, पोलिस राजू मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, हणमंत भोसले, सुजीत भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.