Satara News : नगरसेवकांकडून दारू दुकानासमोर बाकडी

मोळाचा ओढा चौकात तळीरामांची सोय : महिला-मुलींमध्ये धास्ती
Satara News : नगरसेवकांकडून दारू दुकानासमोर बाकडी
Published on: 
Updated on: 

सातारा : सातार्‍यातील मोळाचा ओढा चौकात एका दारू दुकानासमोर नगरसेवकाकडून लोखंडी बाकडी बसवण्यात आली आहेत. त्यामुळे हा चौक तळीरामांचा अड्डा बनला असून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने परिसरातील महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. बरीच बाकडी शेजारच्या प्रभागातील नगरसेवकांनी बसवून या समस्येत भर घातली आहे. तळीरामांसाठी नगरसेवकांकडून एवढी उठाठेव कशासाठी? असा सवाल केला जात आहे.

मोळाचा ओढा ते बुधवार नाका या मार्गावर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. शाहूपुरी, बुधवार नाका परिसरातील नागरिक याच चौकात वाई, महाबळेश्वर, पुण्याकडे जाण्यासाठी थांबतात. याच चौकात असलेल्या एका दारू दुकानामुळे परिसरात सतत तळीरामांचा वावर असतो. या दारू दुकानसमोर नगरसेवकांनी लोखंडी बाकडी बसल्याने आता हा चौक जणू तळीरामांचा अड्डाच बनला आहे. दिवसभर या बाकड्यांवर दारूड्यांचा ठिय्या असल्याने या चौकातून जाणार्‍या महिला व मुलींना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. एखाद्या शाळकरी मुली, कामावर जाणार्‍या महिलांची मानसिक घालमेल होत आहे. या बाकड्यांचा उपयोग सर्वसामान्यांपेक्षा दारू दुकानातून बाहेर पडणार्‍या तळीरामांना जास्‍त होत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवणे आवश्यक असले तरी ती कुठ बसवायची याचंही भान असणे आवश्यक आहे. उद्यान, बसस्थानक, रूग्णालय परिसरासमोर बाकडी बसवणे गरजेचे असू शकते. मात्र, दारू दुकानासमोर बाकडी बसवणे म्हणजे सरळपणे निधीचा अपव्यय आहे. शिवाय हा प्रभाग दुसर्‍या नगरसेवकाचा असताना येथे हस्तक्षेप करण्यामागे संबंधित नगरसेवकाचा नेमका राजकीय हेतू काय, हेही तपासणे आवश्यक आहे. संबंधित नगरसेवकांनी ही बाकडी तातडीने हटवावीत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.