

कोपर्डे हवेली : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपर्डे हवेली परिसरातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बीची पिके डोळ्यादेखत अक्षरशः शेतातच कुजून गेली. तर शेतातील मशागतीची कामेही खोळंबली. नंतर पाऊस लागून राहिल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने खरीप हंगाम लांबला. ज्या ठिकाणी पेरणी झाली तेथील पिके पाण्याने पिवळी पडू लागली आहेत.
सततच्या पावसाने शेतीतील पिकांना फटका बसला असून, विशेषत: ऊस, टोमॅटो या तालुक्यातील प्रमुख पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय, टोमॅटो, वांगी, मिरची,कांदा यासारख्या भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ आणि किडींचा प्रादूर्भाव वाढल्याने उत्पादनात 40 ते 50 टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
सतत पडणार्या या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. उसाच्या मुळांना पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. भात पिके पिवळी पडत चालली आहेत. तसेच, भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ आणि फळांचा सडा यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. स्थानिक शेतकरी आठवड्यापासून पाऊस थांबत नसल्याने टोमॅटो आणि वांगी पिकांचे 70 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. आता बाजारात माल पाठवणेही कठीण झाले आहे.
शेतकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारकडे तात्काळ आर्थिक मदत आणि कर्जमाफीची मागणी केली आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
ज्या शेतकर्यांची शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली होती, त्यांनी हा वळीव पाऊस थांबेल या विचाराने सुरुवातीच्या काळात पेरणी करून घेतली. पण वळीवाच्या पावसाबरोबरच मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने पेरलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात आहे.