

तासवडे टोलनाका : आजी-माजी सैनिकांसह त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांचे कुटुंबीय यांच्या समस्या, अडचणी विषयी 24 तासाच्या आत त्यांना निर्णय मिळावा. तसेच त्या तक्रारीवर कार्यवाही व्हावी, यासाठी कार्यान्वित केलेल्या सातारा दक्ष अॅपची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आजी - माजी सैनिकांनी केली आहे.
सातारा येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कुडुकर, महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग उपसंचालक, सातारा जिल्हा सैनिक अधिकारी निवृत्त कर्नल सतीश हंगे, सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत सैनिक संरक्षण समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीस सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सैनिकांच्या समस्या, अडचणी या विषयी चर्चा करण्यात आली. संरक्षण समिती सदस्यांकडून सैनिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. तसेच सेवारत सैनिक व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पोलिस स्टेशनमधील प्रलंबित तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी तक्रारी समजून घेतल्या. त्यानंतर पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलिस स्टेशनमधील प्रलंबित तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिली. तसेच आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगळ्या रजिस्टरमध्ये तक्रारी नोंदवण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी सैनिक कल्याण अधिकारी रवींद्र इथापे, अंकुश पवार, प्रदीप निकम, कॅप्टन अशोक नलवडे, संजय निंबाळकर, प्रवीण शिंदे, सदाशिव नागणे, संतोष यादव, सुभेदार राजाराम माळी, मस्कु अण्णा शेळके, दीपक काकडे, अनिल शिंदे, राजेंद शेवाळे, आनंदा सोनवणे, सर्व तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.