

सातारा : उत्तर भारतातून येणार्या थंड वार्यांमुळे राज्यात अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला आहे. परिणामी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे अवघे जनजीवन गारठले आहे. गुलाबी थंडीचे रूपांतर आता बोचर्या थंडीत झाले असून, सकाळ व रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. मंगळवारी सातार्याचे तापमान १३.९ तर महाबळेश्वरचे तापमान १५.१ अंशापर्यंत घटले आहे. या वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात थंडीचे आगमन झाले आहे. मात्र अवघ्या काहीच दिवसांमध्ये जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरू लागला आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके आणि दवबिंदू पाहायला मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने जवजीवन विस्कळीत होत आहे. गारठ्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील चौकाचौकांत आणि बस स्थानक परिसरात सकाळी व रात्री शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. कामगार, प्रवासी व ज्येष्ठ नागरिक शेकोटीभोवती बसून थंडीपासून बचाव करत आहेत.
थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीचा अवघ्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. थंडीमुळे पहाटे फिरायला जाणार्यांची संख्या काहीशी रोडावली आहे. तसेच रात्री उशिरा सुरू असणारे व्यवहारही लवकर आटोपते घेतले जात आहेत. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला व ताप यासह आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, व्याधीग्रस्त व ज्येष्ठांनी थंडीत अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने रब्बी हंगामावावर पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे.
त्वचा कोरडी अन् ओठांना चिरा
बोचऱ्या थंडीमुळे त्वचेच्या तक्रारी वाढवत आहे. आधी ऑक्टोबर हिट अन् अचानक बोचऱ्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज सुटते. तसेच हातापायांच्या तळव्यांना भेगा पडणे, टाचा फुटणे, ओठांसह अंगाची त्वचा फाटणे अशा तक्रारी जाणवू लागल्या आहेत. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर वाढवला जात आहे. शरीरात उष्मांक वाढवण्यासाठी गोड अन् उष्ण स्वभावाच्या पदार्थांना आहारात स्थान मिळू लागले आहे.