

सागर गुजर
सातारा : जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत असून संचालक आणि सचिवांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी व सर्वसामान्य ठेवीदारांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या संस्थाच काही ठिकाणी लूटमारीचे केंद्र बनल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विकास सेवा सोसायटी, पतसंस्था, बाजार समिती, सहकारी बँकांतील घोटाळ्यांची मालिका आजपासून सुरू करत आहोत. सभासदांच्या टाळूवरचे लोणी कोपरापर्यंत वगूळ येईस्तोवर हाणणाऱ्या घोटाळेबाज टोळभैरवांची पोलखोल आजपासून...
कर्जवाटपात अनियमितता, बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजुरी, ठेवींचा अपहार आणि हिशेबांमध्ये फेरफार अशा प्रकारांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांमध्ये काही संचालक व सचिव यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या घोटाळ्यांमुळे अनेक शेतकरी, कामगार आणि लहान ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. आयुष्यभराची बचत अडकून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सहकाराच्या तत्त्वांना हरताळ फासून काही जणांनी स्वतःच्या फायद्यासाठी संस्थांचा वापर केल्याचा आरोपही केला जात आहे.
प्रशासन आणि सहकार विभागाकडून वेळोवेळी तपासणी होत असली, तरीही ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्याने घोटाळेखोरांना पाठीशी घालण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून मालमत्ता जप्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांची प्रतिमा या प्रकारांमुळे मलिन होत असून संपूर्ण सहकार क्षेत्रावरील विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. सहकार हा लोकांचा आधार आहे; मात्र काही मोजक्या भ्रष्ट लोकांमुळे हा आधारच डगमगत असल्याने आता कारवाई नाही तर सहन नाही, असा संताप साताऱ्यात उमटत आहे. (क्रमश:)
पोच वरपर्यंत म्हणणाऱ्यांवर टाचा घासायची वेळ
लेखापरीक्षण विभागाने घोटाळेबाजांच्या विरोधात थेट स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्हेगारांनी संघटितपणे ही गुन्हेगारी कृत्य केले आहे. संबंधितांच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी सहकार विभागाने कारवाई केली असून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास फास्ट्रॅक पद्धतीने होऊन घोटाळेबाज गुन्हेगारांना गजाआड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक जणांनी घोटाळ्याच्या माध्यमातून मालमत्ता कमावल्या आहेत. हेच बहाद्दर उजळ माथ्याने फिरत होते. आपली पोच वरपर्यंत आहे, म्हणणाऱ्यांनाच आता टाचा घासायची वेळ आली आहे.
या संस्थांमध्ये कोट्यवधीचे घोटाळे...
शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था, कराड, विसापूर विकास सेवा सोसायटी, विसापूर (ता. खटाव), हरिहरेश्वर सहकारी बँक वाई, यशवंत सहकारी बँक या सहकारी मंदिरांच्या तिजोऱ्या लुटून खाणाऱ्याविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त अजून इतर काही संस्थांचे संचालक सध्या सुपात आहेत. लवकरच ते जात्यात येणार आहेत.