

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या अर्भकाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाहेब शिकलगार (रा. सातारा) याचे निलंबन केले होते. हे प्रकरण शिकलगार याला भोवले असून, आता आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. तसेच, आरोग्य मंत्र्यांनीही चौकशी लावली. यामध्ये जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे व डॉ. शिकलगार यांना निलंबित केले होते. याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य उपसंचालक डॉ. पवार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये डॉ. शिकलगार याच्याविरोधात अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या. सिव्हिल हॉस्पिटल येथे गर्भवती मुलीच्या गर्भपातावेळी नवजात बाळाच्या उपचाराबाबत आवश्यक त्या बाबींची पूर्तता डॉ. शिकलगार यांनी केली नाही. तसेच, अर्भकाचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही बाळाला योग्य उपचार दिले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
मी काय आहे ते बघून घेईन
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साधना कवारे व स्त्रीरोग विभागाच्या प्रभारी परिचारिका अनिता मसुगडे यांनी डॉ. शिकलगार यांना बाळ जिंवत असल्याने त्याला एसएनसीयूमध्ये दाखल करणे व बाळावर आवश्यक ते उपचार करणे गरजेचे आहेे, असे सांगितले होते; पण डॉ. शिकलगार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व मी काय आहे, ते बघून घेतो, असे सांगितले त्यामुळेच अर्भकाचा मृत्यू झाल्याचेही पोलिस तपासात समोर आले.