

सातारा : सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांना बुधवारी शासनाकडून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरीये यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले. गेल्या काही दिवसांपासून सातारा सिव्हिल रुग्णालयात झालेल्या अर्भक मृत्यू व मृतदेहांच्या अदलाबदलीच्या प्रकरणांमुळे डॉ. करपे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
विजापूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. तिची गर्भपाताऐवजी प्रसूती जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली. मात्र, अकाली प्रसूती झाल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात महिला व बालविकास विभागामार्फत याचिका दाखल केली आहे. याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव 2 चे ई. रावेंद्रन, आरोग्य सेवा मुंबई संचालक डॉ. नितीन आंबेडकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी केली. 9 तास अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच पाहणी केली. यासंदर्भात गुरुवारी कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
एकीकडे अर्भक मृत्यू प्रकरण गाजत असतानाच गेल्या महिनाभरात सिव्हिल हॉस्पिटलमधील पीएम रूमममधून दोन वेळा मृतदेहांची अदलाबदल होणाच्या घटना घडल्या. एकाच महिन्यात शवविच्छेदन झाल्यानंतर दोनदा मृतदेह अदलाबदली करून नातेवाईकांना दिल्याचे समोर आले. मृतदेह अदलाबदलीची पहिली घटना तीन मार्च रोजी घडली. माणिकसिंग रजपूत (रा. करंजे, सातारा) यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. याच दरम्यान बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही मृतदेह सिव्हिलच्या शव विच्छेदन विभागात होते. राजपूत यांचे नातेवाईक कर्नाटकमधून येणार असल्याने मृतदेह 4 मार्च रोजी सकाळी घेणार होते. त्यानुसार सिव्हिलमधून सकाळी मृतदेह देण्यात आला. रजपूत नातेवाईकांनी मृतदेह घरी नेल्यानंतर विधी सुरू करत असताना त्यांच्या लक्षात आले की, संबंधित मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. यामुळे करंजेत गोंधळ उडाला.
त्यातच मंगळवारी सुरेश मस्कू खोमणे (वय 51, रा. आरळे, ता. सातारा) व आनंद सुनील ओव्हाळ (वय 26, रा. वाई) असे सिव्हिलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या दोघांच्या मृतदेहांची अदलाबदल झाली होती.
ओव्हाळ याच्या नातेवाईकांना ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिव्हिल प्रशासनाला माहिती दिली. तोपर्यंत खोमणे कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराला सुरुवात केली. ओव्हाळ यांनी माहिती दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ खोमणे कुटुंबीयांना मृतदेह अदलाबलीची माहिती दिल्यानंतर अंत्यसंस्कार थांबवले. या प्रकारामुळे आरळे व सिव्हिल परिसरात राडा झाला. ओव्हाळ कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला; तर खोमणे कुटुंबीयांना मृतदेहही दिला नाही. यामुळे तब्बल 9 तास तणावपूर्ण वातावरण झाले होते. या प्रकाराची जिल्ह्यासह राज्यात चर्चा झाली होती.
या सर्वच प्रकारांमुळे सातारा सिव्हिल रुग्णालयाबाबत जनमानसात संतापाची लाट उसळली. ‘पुढारी’ने जनभावना समोर ठेवून या प्रकरणांमध्ये न्यायाची भूमिका घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालयावरचा कंट्रोल तुटल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे समोर आले. महाराष्ट्र शासनाने ही प्रकरणे गांभीर्याने घेतली व सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे आणि स्त्री रोग तज्ज्ञ शिकलगार यांना निलंबित करण्याचे आदेश बजावले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरीये यांनी काढलेल्या निलंबित आदेशात म्हटले आहे की, डॉ. युवराज करपे व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे योजले आहे. राज्यपाल, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 4 च्या पोटनियम (1) (अ) मधील तरतुदीनुसार त्यांना निलंबित केले जात आहे.
हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत डॉ. युवराज करपे यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ कार्यालय येथे राहील आणि डॉ. युवराज करपे यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा स्वतःला व्यापार अथवा उद्योगधंद्यामध्ये गुंतवून घेता येणार नाही. असे गैरवर्तन केल्यास नियमानुसार कारवाईस ते पात्र राहतील, असे आदेशात म्हटले आहे. असाच आदेश शिकलगार यांच्या बाबतीतही काढण्यात आला आहे.