

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागातील काही पेठांमध्ये रविवारी नळांना अचानक पिवळसर पाणी आल्याने खळबळ उडाली. सुट्टीच्या दिवशी असा रंगमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुठेतरी जलवाहिनी फुटल्यामुळे किंवा सांडपाणी मिसळल्यामुळेच पाणी दूषित झाले असावे, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात होता.
शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या पेठांना कासचा पाणीपुरवठा होत आहे. गेले काही दिवसांपासून याभागात पिवळसर पाणी येत आहे. त्यातच रविवारी जास्त गढूळ पाणी आल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिसरात चिंतेचे सावट पसरले. या पार्श्वभूमीवर, पालिकेने योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, कासचा इतर पेठांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा होत असून पश्चिमेस असणारा पाणी पुरवठा का दूषित होत आहे. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे पाणी दूषित नसून रासायनिक प्रक्रियेमुळे त्याचा रंग बदलला आहे. उन्हाळ्यामुळे जलस्त्रोतांमधील लोहाचे प्रमाण वाढले आहे. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी निर्जंतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमधील क्लोरिनची लोहाशी प्रक्रिया झाल्याने पाण्याला लालसर रंग आला आहे. प्रामुख्याने कास योजनेद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागात हा परिणाम जाणवत आहे. शहराला पुरवले जाणारे पाणी सांबरवाडी आणि जकातवाडी येथील केंद्रांवर शुद्ध केले जाते.
याशिवाय नगरपालिकेच्या जकातवाडी येथे असलेल्या प्रयोगशाळेत पाण्याची पीएच आणि लोहाची पातळी तपासल्यानंतरच ते शहरात सोडले जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काही दिवस गाळून व उकळून पाणी प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.