Satara City Bus: वीस वर्षे सिटी बस बंद; सातारकरांचा ‘सातारी बाणा’ गेला कुठे?

आमदार-खासदारांना जाब विचारण्याचे धाडस का होत नाही? : दीपक पवारांचा सवाल
Dipak Pawar
दीपक पवार
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरातील सिटी बस सेवा तब्बल वीस वर्षांपासून बंद आहे. शहरातील सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सामाजिक संस्था आणि वृत्तपत्र समूहांकडून आता सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी आवाज उठवला जात आहे. सह्यांची मोहीम राबवून एस.टी. महामंडळाकडे मागणीही केली जात आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून सातारकर या प्रश्नावर गप्प का राहिले? आपल्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी एवढी वर्षे का लागली? असा परखड सवाल नागरिक दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. असे असताना सातारा शहरातील सिटी बस सेवेसारखा महत्त्वाचा प्रश्न गेली दोन दशके प्रलंबित असताना आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष का दिले नाही, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

सिटी बस सेवा बंद असल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः राज्य शासनाच्या महिला प्रवाशांसाठीच्या ५० टक्के तिकीट सवलतीचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीचा लाभ सिटी बसअभावी सातारकरांना मिळत नाही. या सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवण्यास जबाबदार कोण? असा सवालही पवार यांनी केला.

सातारा शहरातील सजग नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट लोकप्रतिनिधींकडे जाऊन नागरी सुविधांबाबत जाब विचारण्याची गरज आहे. शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून विविध नागरी सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींच्या विरोधात ठामपणे आवाज उठवला जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

सातारा शहरातील नागरिक नागरी सुविधांपासून कित्येक वर्षे वंचित आहेत. तरीही लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे धाडस होत नसेल, तर हे लोकप्रतिनिधींवरील प्रेम म्हणायचे की भय, असा सवालही त्यांनी केला. ‘सातारी बाणा’ अशी ओळख सांगणारा सातारचा माणूस आता केवळ बोलतोय; प्रत्यक्षात तो बाणा दाखविण्याची वेळ आली आहे. सिटी बससह शहरातील नागरी सुविधांसाठी नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा. वीस वर्षे गप्प बसल्यानंतर आता तरी जागे व्हा, असे आवाहन दीपक पवार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news