Satara Theft: सायरन वाजताच चोरट्यांची पळापळ

चितळीतील डीपी चोरीचा प्रयत्न फसला; सीसीटीव्हीत चोरटा कैद
Satara Theft
Satara TheftPudhari
Published on
Updated on

वडूज : वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती या समस्येला कंटाळलेल्या चितळी येथील शेतकऱ्यांनी स्वतःच उपाय शोधला. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न झाला; मात्र शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे व सायरनमुळे चोरट्यांचा डाव फसला. विशेष म्हणजे, या घटनेत चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला असून आता मायणी पोलिसांना त्याचा सुगावा लागणार का?, असा सवाल केला जात आहे.

चितळी येथील टेंभू कॅनॉलजवळील ‌‘जंगल डीपी‌’ हा परिसर चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणी डीपी चोरीच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परिणामी शेतीसाठी पाणी पुरवठाही खंडित होत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला.

25 फेब्रुवारी रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व उच्च क्षमतेचा सायरन बसवला. 5 मार्चच्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र डीपीला हात लागताच सायरन सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सायरनचा आवाज ऐकून चोरटे घाबरून पळ काढताना दिसले. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे.

वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीतील शेतकरी हैराण झाले आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा फोटोच उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news