Food Adulteration: भाज्यांवर रंग, फळे पिकवण्यासाठी कार्बाईडचा वापर

जिल्ह्यात केमिकल मार्केटिंगचे रॅकेट : उत्पादनासाठीही रसायनांचा वापर
Food adulteration
Food adulterationPudhari
Published on
Updated on
आदेश खताळ

सातारा : बाजारातील टवटवीत दिसणार्‍या हिरव्या भाज्या आणि चकचकीत पिवळी-लाल फळे पाहून तोंडाला पाणी सुटते. मात्र फळे व भाज्या आकर्षक दिसण्यामागे रसायनांचे थरावर थर कारणीभूत आहेत. कापड व चर्मोद्योगात वापरला जाणारा मलाकाईट ग्रीन रंग हिरव्या भाज्यांवर फवारला जातो. बांधकाम क्षेत्रातील कॅल्शियम कार्बाईडचा वापर फळे पिकव्यासाठी केला जात आहे. कायद्याने बंदी घातलेल्या दोन्ही रसायने जिवावर उठली आहेत. जिल्ह्यातील फळे व भाजी मार्केटमध्ये केमिकल मार्केटिंग रॅकेट प्रचंड सक्रिय असून अन्न व औषध प्रशासनाने या कलर माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आहारामध्ये येणार्‍या पालेभाजांची पिके प्रचंड रसायनांचा वापर करून घेतली जातात. शेतातच विषाच्या फवारणीला सुरुवात होते. उत्पन्न वाढीसाठी प्रचंड पेस्टीसाईडचा वापर केला जात आहे. पालक, मेथी, कोथिंबीर यावर मलाकाईट ग्रीन फवारल्याने त्या भाज्या गडद हिरव्या रंगाच्या आकर्षक दिसतात. पाण्याने धुऊनही हा रंग निघत नाही. शिवाय त्या दोन-तीन दिवस ताज्या दिसतात. यातूनच ‘कलर माफिया’ फोफावत चालला आहे. कारले, भेंडी, मिरची याला ऑक्सिटोसिन इंजेक्शन देऊन त्यांचा आकार फुवला जातो. रंगही टिकून ठेवण्यासाठी या हार्मोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वांगी, टोमॅटो यांच्यावर कृत्रिम रंग फवारून आकर्षकपा व चकचकी आणली जाते. मेलेथिऑन, क्लोरपायरीफॉस ही किटकनाशके पालेभाज्यांच्या काढणी अखेरपर्यंत फवारली जातात. त्यामुळे ती धुऊनही पूर्णपणे निघून जात नाहीत. इथेफॉन हे रसायन फळे लवकर पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारले जाते.

जेवणात येणार्‍या फळे व भाज्यांची सुरुवातच रसायनांपासून होते. ही फळे व भाज्या ग्राहकांपर्यंत पोहोच होईपर्यंत त्यांच्यावर मधल्या साखळीकडून आणखी रसायनिक प्रक्रिया केली जाते. फळगाड्यांवरील फळे चकचकीत दिसण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईडचाही वापर केला जातो. केळी, आंबा, पपई, टॉमेटो यांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा सर्वाधिक वापरले जाते. या रसायनातील एसिटिलीन नावाचा गॅस फळे पिकवतो. सफरचंद, द्राक्षे यांना चमकदार ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे वॅक्स लावले जाते. केमिकल मार्केटिंग रॅकेट दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. यामध्ये उत्पादक, व्यापारी, वाहतूकदार, बाजार समितीमधील काहीजण सामील आहेत.

मलाकाईट ग्रीनमुळे कॅन्सर होतो. लिव्हर व किडनी निकामी होते. काबाईड व एसिटिलीनचा मेंदूवर परिणाम होतो. मळमळ, उलटी यासारखे त्रास होतात. ऑक्सिटोसिनमुळे मुलींमधील हार्मोनल संतुलन बिघडते. क्लोरपायरीफॉस मज्जासंस्थेवर परिणाम करते. लहान मुलांची वाढ त्यामुळे खुंटते. इथेफॉनच्या अतिप्राणामुळे त्वचारोग, श्वसनाचे आजार व पचनाचे विकार होतात. औद्योगिक वॅक्समुळे आतड्यांवर परिणाम होतो. लहान मुले, गर्भवती स्त्रिया तसेच वृद्धांसाठी ही रसायने अत्यंत घातक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने बाजार समित्या, भाजी व फळविक्रेत्यांच्या गोडाऊन अचानक तपासून कारवाई करणे आवश्यक आहे. दोषी व्यापार्‍यांचे परवाने तातडीने रद्द करून शेतकर्‍यांना सेंद्रिय व नैसर्गिक शेती माल उत्पादनासंदर्भात प्रशिक्षण दिले तर भाज्या व फळांसाठी वापरल्या जाणार्‍या रासायनांचा वापर टाळता येऊ शकतो.

परदेशात निर्यात होणारी फळे व भाज्यांमध्येही पेस्टीसाईडचे जादा प्रमाण आढळले आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने कंटेनरच्या कंटेनर नाकारले. परदेशात पाठवल्या जाणार्‍या मालाचा दर्जाच जर इतका खालावलेला असेल तर देशांतर्गत विक्री केल्या जाणार्‍या अन्नपदार्थाचा स्तर किती ढासाळलेला असू शकतो, याची यावरून कल्पना येते. त्यामुळे बाजारात थैमान घालणार्‍या भेसळखोरांना, अन्नपदार्थांसोबत जीवघेणा खेळ खेळणार्‍या माफियांना कडक शिक्षा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news