Satara News: चांदोबा लिंबनजीकचे तिकाटणे ठरतेय जीवघेणे; वारंवार अपघात

अनेकांचे बळी, कित्‍येक जायबंदी : एनएचएआयचे दुर्लक्ष
Satara News: चांदोबा लिंबनजीकचे तिकाटणे ठरतेय जीवघेणे; वारंवार अपघात
Published on
Updated on
शशिकांत जाधव

लोणंद : आळंदी ते पंढरपूर या नवीन पालखी राष्ट्रीय महामार्गावरील तरडगावजवळील चांदोबाच्या लिंबाजवळ तीन रस्ते एकत्र येणारा तिकाटणे चौक सध्या अपघातांचा मुख्य केंद्रबिंदू बनले आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर एनएचएआय आणि सरकार जागे होऊन येथे उड्डाणपूल उभारणार? असा संतप्त सवाल नागरिक व वाहनचालकांकडून केला जात आहे.

आळंदी ते पंढरपूर या मार्गावर रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते विकास केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ६५० कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ विकसित करण्यात आला आहे. या मार्गातील अनेक ठिकाणी जुन्याच रस्त्याचा वापर करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी नवीन पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे.

लोणंद ते तरडगाव दरम्यान चांदोबाच्या लिंबाच्या अलीकडे म्हणजेच लोणंदच्या बाजूकडे या पालखी मार्गाला जेजुरीकडे जाण्यासाठी बाह्यवळण देण्यात आले आहे. हे बाह्यवळणच आता वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. पालखी मार्गाला देण्यात आलेल्या या बाह्यवळणामुळे तीन रस्ते एकत्र येत असल्याने तिकाटण्याचा चौक धोकादायक बनला आहे.

या तिकाटण्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे जखमींना तातडीने मदत होण्या बरोबरच या परिसरात होणाऱ्या चोऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोणंद पोलिसांचे वतीने पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे परंतु पोलिस मदत केंद्र हा उपाय नाही तर अपघातावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी उड्डान पूल होणे गरजेचे आहे .

गेल्या दोन वर्षांच्या काळात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे बाह्यवळण सुरू होणाऱ्या या तिकाटण्याच्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. अपघातांच्या वाढत्या घटना पाहता हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असतानाही उपाययोजना का केली जात नाही? असा सवाल केला जात आहे.

हे ठिकाण अपघातांचा ब्लॅक स्पॉट/'डेड स्पॉट' आहे. नॅशनल हायवेने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जिवितेला धोका निर्माण करणारी परिस्थिती तशीच राहिली व येथुन पुढे अपघात मृत्यू घटना घडली की संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी यांनाच दोषी धरुन त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
कय्युम मुल्ला सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news