Satara Crime: ‘त्या’ चेन स्‍नॅचरच्या मुसक्‍या आवळल्‍या शहर पोलिसांची कामगिरी

गुन्‍ह्यांची दिली कबुली
Satara Crime: ‘त्या’ चेन स्‍नॅचरच्या मुसक्‍या आवळल्‍या शहर पोलिसांची कामगिरी
Published on
Updated on

सातारा : शाहूपुरी पोलिसाच्या गलथान कारभारामुळे पकडलेल्‍या चेन स्‍नॅचरची न्‍यायालयातून सहज 'सुटका' होवून तो 'गायब' झाल्‍याचे वृत्त मंगळवारी दै.'पुढारी'ने प्रसिध्द करताच काही तासातच सातारा शहर पोलिसांनी त्‍याच्या मुसक्‍या आवळल्‍या. दरम्‍यान, संशयिताने सातार्‍यात अनेक ठिकाणी चेन स्‍नॅचिंग केल्‍याच्या गुन्‍ह्यांची कबुली दिली आहे.

श्रीपाद लोळगे (वय ३५, रा. पाचवड, ता. वाई) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सातारा शहरात गेल्‍या १५ दिवसांमध्ये चेन स्‍नॅचिंगच्या सलग घटना घडल्‍या आहेत. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही पोलिसांकडून तपास लागत नव्‍हता. चार दिवसांपूर्वी संशयित आरोपी चेन स्‍नॅचरला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्‍हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने पकडले. पोलिसांनी त्‍याला अटक केली. न्‍यायालयात हजर केल्‍यानंतर मात्र तपासी अधिकार्‍याच्या कागदपत्रांच्या त्रुटीचा फायदा संशयिताला झाला. यामुळे त्‍याची न्‍यायालयातून सहज सुटका झाली.

शाहूपुरी पोलिस कागदपत्रांच्या त्रुटीची पडताळणी करत असतानाच संशयिताने न्‍यायालयातून मोबाईल स्‍वीच ऑफ करुन धूम ठोकली. ही बाब समोर आल्‍यानंतर शाहूपुरी पोलिस तोंडघशी पडले. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्‍नॅचर तोच असल्‍याचे समोर आल्‍यानंतर त्‍यांनीही संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्‍न चालवला. दोन दिवस शहर पोलिसांनी भुईंज, पाचवड व बारामती येथे तळ ठोकला होता. अखेर मंगळवारी संशयित चेन स्‍नॅचरला पोलिसांनी अटक केली. आज त्‍याला न्‍यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्‍यान, प्राथमिक चौकशीमध्ये सातार्‍यातील काही चेन स्‍नॅचिंगची कबुली त्‍याने दिली आहे. पोनि सचिन म्‍हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस तुषार भोसले, पंकज मोहिते, सागर गायकवाड, अजिंक्‍य माने, सुहास कदम, वैभव माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दै.'पुढारी'च्या वृत्तानंतर तपासाला गती

मंगळवारी दि. ४ ऑगस्‍ट रोजी शाहूपुरी पोलिसामुळे चेन स्‍नॅचर 'सुटला' हे वृत्त दै.'पुढारी'ने प्रसिध्द केल्‍यानंतर जिल्‍हा पोलिस दलात खळबळ उडाली. सातार्‍यात चेन स्‍नॅचिंगचा खैंदुळ सुरु असताना चेन स्‍नॅचर सहज सुटल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त होते. दै. 'पुढारी' च्‍या वृत्तानंतर शाहूपुरी तसेच शहर पोलिसांनी तपासाला गती दिली. शहर पोलिसांनी संशयिताला पकडण्यासाठी फिल्‍डींग लावली आणि दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्‍यानंतर अवघ्या काही तासात चेन स्‍नॅचरला जेरबंद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news