

सातारा : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासंबंधीची अधिसूचना शुक्रवारी जारी झाल्यानंतर सातार्यात वकील, पक्षकार मंडळींनी जल्लोष केला. गेल्या चार दशकाहून अधिक काळ यासाठी लढाई सुरू होती. याप्रश्नी दै. ‘पुढारी’नेही मोठा लढा उभारला होता. आता कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सातारा जिल्ह्यालाही फायदा होणार आहे.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे, यासाठी कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातून मोठा उठाव झाला होता. ‘दै. पुढारी’नेही हा विषय अजेंड्यावर घेत धसास लावला. सातारा जिल्हा बार असोसिएशनने अनेक प्रकारची आंदोलन केली. सातार्यात 58 दिवसांचे आंदोलनही करण्यात आले होते. पक्षकारांसह सामाजिक संस्था यांचाही या आंदोलनाला पाठींबा होता. सातार्यातील वकील व पक्षकारांना खटले चालवण्यासाठी मुंबईला जाणे खर्चिक व वेळखावूपणाचे होते. पक्षकारांच्या खिशाला मोठी कात्री यामुळे लागत होती. मागणीचे आंदोलन झाल्यानंतर सरकार दरबारी तात्पुरती मलमपट्टी होऊन आश्वासन मिळायचे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही होत नव्हती.
अखेर कोल्हापूर येथे सर्किट बेंचला मान्यता मिळाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या आंदोलनाला हे मोठे यश आले आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील पक्षकार, वकील संघटना व नागरिकांकडून स्वागत होऊन चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.