Shivendraraje Bhosale : कोंडी टाळण्यासाठी आऊट गेट पुढे काढा

ना. शिवेंद्रराजे; बैठकीत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर दररोज वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढच्या बाजूने (पारंगे चौक) आऊट गेट काढा, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात चालढकल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ना. शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खडसावले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ना. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांत आशिष बारकूल, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तापोळा- आपटी ब्रिज रस्ता अधिग्रहण करणे, वर्णे आबापुरी तीर्थक्षेत्राच्या विविध कामाचा आढावा, आंबेघर तर्फ कुडाळ येथील जमीन, म्हसवे, ता. सातारा येथील कातकरी गृहसंकुल 20 टक्के वाढीव अनुदान व लाभार्थी सर्वेक्षण, कुशी ता. सातारा येथील डवरी समाजातील लोकांसाठी घरकुले उपलब्ध करणे, नागेवाडी येथील आयटी पार्कचा प्रस्ताव शासनाकडे सदर करणे, परळी, ता. सातारा येथील 6 गावांचे एलजीडी कोड, जिल्हा खनिज प्रतिष्ठाण प्रलंबित निधी, तांडावस्ती प्रस्ताव मंत्रालयात सादर करणे आणि सातारा बस स्थानक आराखडा अंतिम करणे या विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान, सातारा बस स्थानक आराखडा अंतिम करण्याचा विषय आल्यानंतर विभाग नियंत्रक श्रीमती गायकवाड व इतर अधिकाऱ्यांनी तयार केलेला आराखडा सादर केला. त्यामध्ये नवीन आऊट गेटचा कुठेही उल्लेख नसल्याने ना. शिवेंद्रराजे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढच्या बाजूने आऊट गेट काढणे आवश्यक असल्याचे सांगून तसा सुधारित आराखडा तयार करण्याची सूचना केली. त्यावर श्रीमती गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी थातुरमातुर कारणे देत चालढकल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ना. शिवेंद्रराजे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांना खडे बोल सुनावले.

वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला असून तो सुटलाच पाहिजे यासाठी बस स्थानकाच्या पुढच्या बाजूने बसेस बाहेर पडण्यासाठी आऊट गेट काढा. तसा सुधारित आराखडा तयार करा आणि प्रस्ताव शासनाकडे सादर करा. सदर प्रस्ताव कसा मंजूर करून घ्यायचा हे मी बघतो, असे ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले. सद्यस्थितीत असलेल्या बस स्थानक रचनेत काहीही बदल न करताच हा आराखडा कसा तयार करताय. नवीन अद्ययावत आराखडा तयार करा, जेणेकरून प्रवाशांनाही विविध प्रकारच्या सुविधा मिळतील. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करा, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news