

सातारा : सातारा शहरातील राधिका रोडवरील बंद बंगला फोडून चोरट्याने रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. चोरीमुळे परिसर हादरून गेला आहे. राजन हरकचंद मामणिया (वय 57, रा. राधिका रोड, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही चोरी दि. 2 ते 3 ऑगस्टदरम्यान झाली आहे.
अधिक माहिती अशी : मामणिया यांचा विश्वम नावाचा बंगला असून ते हॉटेल मालक आहेत. बंगला बंद असल्याने चोरट्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरून मागील बाल्कनीच्या दरवाजाचे लॉक तोडून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूमच्या लॉकरमधील सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. यामध्ये रोख 3 लाख 80 हजार रुपये, 40 हजारांचे जोड हिर्यांचे पदक, 90 हजारांची सोन्याची चेन, 20 हजारांचे कानातील जोड, 10 हजारांचे सोन्याचे पदक, 50 हजारांचा सोन्याचा तुकडा, 25 हजाराचे कॉईन, राणीहार, लॉकेट, कर्णफुले, लॉकेट सेट असा मुद्देमाल चोरुन नेला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.