Satara News: बीएसएनएल टॉवर ठरले शोपीस

गावडेवाडी, अवसरी, वनकुसवडे येथील मोबाईलधारक संतप्त
Satara News: बीएसएनएल टॉवर ठरले शोपीस
Published on
Updated on

मारूल हवेली : 'डिजिटल इंडिया'च्या घोषणा एकीकडे होत असताना दुसरीकडे पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील गावांमध्ये बीएसएनएलच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मोबाईल नेटवर्कपासून वंचित राहावे लागत आहे. गावडेवाडी, अवसरी आणि वनकुसवडे या गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले बीएसएनएलचे तीन मोबाईल टॉवर सध्या केवळ शोपीस ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या तिन्ही गावांमध्ये प्रत्येकी एक बीएसएनएल टॉवर उभारण्यात आला असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून या टॉवरवर नेटवर्कच उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महिन्यातून एखादे-दोन दिवसच कसाबसा सिग्नल मिळतो, तर उर्वरित २५ ते २७ दिवस संपूर्ण नेटवर्क गायब असते. त्यामुळे नियमित रिचार्ज करूनही मोबाईलचा उपयोग होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. टॉवर उभे आहेत, वीज बिलही भरले जाते. मात्र नेटवर्कच मिळत नसेल तर हे टॉवर केवळ शोभेसाठी उभारले आहेत का? सेवा देऊ शकत नसाल तर हे टॉवर हटवावेत, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

गावडेवाडी, अवसरी, वनकुसवडे आणि काठी ही गावे घनदाट जंगल व डोंगरकपारीत वसलेली आहेत. पावसाळ्यात दरड कोसळणे, वैद्यकीय आणीबाणी, गरोदर महिलांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची वेळ, वन्यप्राण्यांचे हल्ले अशा आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. दुर्घटना घडल्यास मदतीसाठी संपर्क साधायचा तरी कसा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

या परिसरात खाजगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर नसल्याने नागरिकांचा एकमेव आधार बीएसएनएल आहे. मात्र बीएसएनएलची सेवाही वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः संपर्कविहीन झाले आहेत.

बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गावडेवाडी, अवसरी आणि वनकुसवडे येथील टॉवरची प्रत्यक्ष पाहणी करून बॅटरी बॅकअप, जनरेटर, ऑप्टिकल फायबर जोडणी तसेच इतर तांत्रिक बिघाड त्वरित दूर करावेत आणि कायमस्वरूपी मोबाईल सेवा सुरू करावी.दरम्यान, लवकरात लवकर नेटवर्कची समस्या सोडवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य दिनेश पवार (काठी) यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news