

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील कोयना नदीवरील हातलोट व कासरुड या गावांना जोडणारा पूल भेगाळला आहे. या पुलावरील दोन ते तीन ठिकाणी रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्या असून एका बाजूला रस्ता खचला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी या पुलाची पाहणी केली.
हातलोट ते कासरुडदरम्यानचा हा पूल पावसामुळे कमकुवत झाला होता. धोकादायक पुलामुळे या परिसरातील नागरिकांना दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली. या पुलाचे काम बांधकाम विभागाच्यावतीने गतवर्षी सुरु करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे काम पूर्ण करण्यात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन पावसाळ्यानंतर तांत्रिक अडचण दूर करून लगेच या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाच्या जागेवर 4 कोटी 96 लाख रुपयांच्या निधीमधून पुलाच्या उभारणीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना मकरंद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुलाचे पंधरा दिवसांपूर्वीच दिमाखात लोकार्पण संपन्न झाले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तरी या दुर्गम भागातील नागरिकांचे हाल थांबणार असा समज होता मात्र लोकार्पणानंतर पंधराच दिवसात या पुलाला भेगा पडल्या.रस्ता एका बाजूला खचला असल्याचे दिसत असून अशा ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने समज द्यावी. अधिकार्यांनी स्वतः लक्ष देऊन पुलाची तातडीने डागडुजी असून दर्जेदार काम ठेकेदाराकडून करून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.