

खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी बोगद्याबाहेर कॅनॉलजवळ रविवारी सायंकाळी ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने थरार निर्माण झाला. या ट्रकने सहा चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र अपघातातील सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाला. ट्रक खंबाटकी बोगदा पार करून धोम-बलकवडी कॅनॉलजवळील उतारावर गेल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुढे चाललेल्या सहा कारवर आदळला. काही अंतरावर ट्रक थांबवण्यात चालकाला यश आले. परंतु, ज्या कारवर हा ट्रक आदळला त्या कारने पुढील वाहनांना धडक दिली. यामुळे काही चालक जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सपोनि संतोष मस्के, महामार्ग पोलिसांचे पथक आणि स्थानिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर गाड्यांची मोठी वर्दळ होती. या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.