

खंडाळा : मुंबई येथे पार पडलेल्या खो-खो राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत चौदा वर्षांखालील किशोर गटात तब्बल 39 वर्षांनंतर प्रथमच अजिंक्यपद पटकावून राज्याच्या क्रिडा क्षेत्रात सातारा जिल्हा खो-खो संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे.
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मान्यतेने येथील मुंबई खो-खो संघटनेच्या विद्यमाने राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा पार पडल्या. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सातारा आणि पुणे यांनी 12-12 अशी बरोबरी साधली होती. मात्र, यानंतर सातारा संघाने मोक्याच्या वेळी खेळ उंचावत पुणे संघाला मागे टाकले. आयुष यादव, आयुष पांगारे, वरद पोळ, स्वराज गाढवे आणि स्वराज उत्तेकर यांनी साताऱ्याकडून छाप पाडली.या ऐतिहासिक विजयासोबतच खंडाळा येथील शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पुरस्कारांवरही आपले नाव कोरून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत सातारा संघाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंनी आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांची मने जिंकली . यामध्ये
पारगावचा सुपुत्र आयुष यादवला सर्वोत्कृष्ट खेळाडू चा राणाप्रताप या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अटीतटीच्या सामन्यांमध्ये आपल्या वेगवान चढायांनी प्रतिस्पर्ध्यांना चकित करणाऱ्या वरद पोळ याने सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडू हा पुरस्कार पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर आयुष यादव, वरद पोळ, स्वराज उतेकर, आयुष पांगारे या चार खेळाडूंचा राज्याच्या संघात समावेश झाला आहे. या यशाबद्दल शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक दिग्विजय खंडागळे, महेंद्र कुमार गाढवे, विजय गाढवे, विनोद खंडागळे यांचे कौतुक होत आहे. तसेच खंडाळा विभाग शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष सुरेश पवार, सचिव संजीव ऊर्फ अनिरुद्ध गाढवे, जिल्हा क्रीडा समन्वय श्रीकृष्ण यादव यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.