

सातारा : सातारा पोलिस दलाच्या ‘डायल 112’ यावर दररोज शेकडो कॉलचा धुमधडाका होत असून त्यामध्ये फेक कॉलचाही पाऊस पडत आहे. मजेशीर, गमतीशीर कारणे सांगून त्यावर पोलिसांनीच उपाय करावा, असा हट्टच धरला जातो.‘बॉयफ्रेेंडला चाल द्या’, असे म्हणत पोलिसांना अनेक कॉल येत आहेत. दरम्यान, 2024 मध्ये महिलांनी डायल 112 वर सर्वाधिक कॉल केले आहेत.
पोलिसांच्या मदतीसाठी पूर्वी डायल 100 हा क्रमांक होता. 4 वर्षापूर्वी केंद्र शासनाने त्यामध्ये बदल करत पोलिसांच्या मदतीसाठी डायल 112 हा टोल फ्री क्रमांक निश्चित केला. अशा महत्वाच्या विभागात अनेकदा गमतीशीर फोन येतात. गेल्या काही वर्षांमध्ये अशा फेक कॉलचे प्रमाण वाढू लागल्याने त्यासंबंधी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सातारा पोलिस दलाच्या डायल 112 वर एका युवतीने नाराजीच्या सुरात ‘मला माझा बॉयफ्रेंड भेटायला आला नाही. मी नाराज आहे,’ अशा पद्धतीचा कॉल आला. पोलिसांनी तिला फैलावर घेत समज दिली. दुसर्या एका घटनेत घरासमोर झाडावर माकड उड्या मारत असल्याचा एकाने पोलिसांना कॉल केला.
पोलिसांनीच त्या माकडाला हुसकावून लावले पाहिजे, असा हट्ट धरल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. असे फेक येणार्या कॉलप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. सातारा पोलिस दलात डायल 112 हे युनिट अत्याधुनिक व प्रशस्त आहे. या विभागात सध्या 1 पोलिस अधिकारी व 14 पोलिस कर्मचारी नियुक्त आहेत. याशिवाय डायल 112 च्या सॉफ्टवेअर, हार्डवेअरमध्ये तांत्रिक अडचण आल्यास त्यासाठी दोघेजण 24 तास उपलब्ध आहेत. या माध्यमातून पोलिस धनाजी काळंगे, अतुल कुंभार, सरोज फरांदे हे पोलिस प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान, डायल 112 चे मुख्य नियंत्रण मुंबई येथे आहे. राज्यात कुणीही कॉल केल्यास त्या-त्या जिल्ह्याच्या डायल 112 वर तो ट्रान्सफर केला जातो. त्यानुसार या विभागाकडून संबंधिताची अडचण ऐकून तात्काळ म्हणजे अवघ्या 6 ते 7 मिनिटांपर्यंत पोलिस दलाची मदत मिळत आहे.
मोबाईल डाटा टर्मिनेटर अर्थात एमडीटी हे प्रत्येक डायल 112 वरील वाहनामध्ये डिव्हाईस देण्यात आले आहे. हे डिव्हाईस पोलिस मुख्यालयाच्या डायल 112 ला कनेक्ट आहे. तसेच डायल 112 च्या सर्व वाहनांना जीपीएस आहे. यामुळे मदतीसाठी फोन करणारा, डायल 112 मधून मदतीसाठी जायला सांगणारे संबंधित वाहन यावर मॉनिटरींग केले जाते. पोलिस त्याठिकाणी पोहचले की नाही? नेमके कुठपर्यंत वाहन आहे हे कॉम्प्युटरवर दिसत असते. अशाप्रकारे संपूर्ण जिल्हा डायल 112 च्या 105 वाहनांना मुख्यालयासह कनेक्ट आहे.