

सातारा; पुढारी वृत्तसेवा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे बालभारती भाडांराकडून वितरण केले जाते. ही पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, अनुदानित आदी शाळांना वितरित केली जातात. अगामी शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन सुरु केले आहे. बालभारतीकडे जिल्हा परिषदेने सुमारे 12 लाख 10 हजार 152 पुस्तकांची मागणी नोंदविली आहे.
जुने शैक्षणिक वर्ष संपत असतानाच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षाची कार्यवाही सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरु होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्यांचे चेहरे खुलून जातात.
कोरोनामुळे गतवर्षी पुस्तकांची छपाई उशिरा झाल्याने विद्यार्थ्यांनाही शालेय पुस्तके उशिरा मिळाली. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षांच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडतील. याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत एकूण 1 लाख 47 हजार 161 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 लाख 71 हजार 471 पुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली आहे. सहावी ते आठवी पर्यंत एकूण 1 लाख 73 हजार 174 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 6 लाख 38 हजार 681 पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे. तसेच गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे.
पहिलीच्या विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे. पहिलीसाठी सर्व विषय मिळून एकच पुस्तक राहणार आहे. दर तीन महिन्यांनी ते बदलणार असून पुस्तक चार भागात राहणार आहे. त्यामध्ये सर्व विषयांचा अभ्यास राहणार आहे.