Satara News : घरासमोर जादूटोण्याचा उतारा; ‘पोपट पुढचे वर्ष बघणार नाही’ अशी धमकी

घराच्या मुख्य दरवाजासमोर जादूटोण्याचा उतारा करून त्यावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार म्हसवड येथे उघडकीस आला
Satara News : घरासमोर जादूटोण्याचा उतारा; ‘पोपट पुढचे वर्ष बघणार नाही’ अशी धमकी
Published on: 
Updated on: 

म्हसवड : घराच्या मुख्य दरवाजासमोर जादूटोण्याचा उतारा करून त्यावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार म्हसवड येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोपट भगवान लोखंडे (रा. म्हसवड) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला असून, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी लोखंडे यांच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर एका पुडीत लिंबू, गुलाल व अन्य साहित्य ठेवून अज्ञात व्यक्तीने जादूटोण्याचा उतारा केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या पुडीवर ‘पोपट पुढचे वर्ष बघणार नाही’ असा मजकूर लिहिलेला आढळला. त्यामुळे हा प्रकार आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय लोखंडे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या घटनेमुळे लोखंडे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून तपास करावा, घटनास्थळी आढळलेल्या हस्ताक्षराची तपासणी करावी, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ तसेच भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे. या प्रकारामुळे म्हसवड परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.