

सातारा : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांना घेरण्याचे भाजपने काही सोडलेले नाही. निवडणुकीनंतर व जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेनंतरही भाजपने विशेषत: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई विधानसभा मतदारसंघ टार्गेट केला आहे. बावडा, पळशी, मांढरदेव, जांब या गावांमधील कार्यक्रमांनंतर भाजपने आज जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत वाई शहरातच कार्यक्रम लावून मकरंदआबांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा स्वारी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच मकरंदआबा पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच न मिटल्याने राज्याने अभूतपूर्व असा राडा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवेळी पाहिला. जयकुमार गोरे यांच्या या मोहिमेत शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी मित्राशीही दोन हात केले. सत्ता स्थापनेनंतर भाजप व राष्ट्रवादीमधील हा संघर्ष थांबेल, असे महायुतीतल्या जाणकारांना वाटत होते.
मात्र, आभाळ एवढे फाटले आहे की, आता टाके घालून ते शिवता येणार नाही. त्यामुळे महायुतीतल्या या दोन घटकपक्षांमधली दरी आणखीनच वाढत आहे. खंडाळा तालुक्यातील बावडा येथे गेल्या आठवड्यात आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिलेल्या व सहस्त्रचंद्र सोहळ्याला भाजपवासी असलेल्या माजी सभापती एस. वाय. पवार यांच्या सोहळ्याला जयकुमार गोरे व शिवेंद्रराजे भोसले या मंत्र्यांनी हजेरी लावून तोफेला पुन्हा बत्ती दिली. मकरंदआबांच्या खंडाळ्यातील हुकमी एक्क्याला पाडून पंचायत समितीचा सदस्य झालेल्या अतुल पवार या युवा कार्यकर्त्याच्या निमंत्रणाला मान देत दोन्ही मंत्र्यांनी बावड्यात जाऊन त्यांना दिलेली ताकद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या दोघांची गाडी तिथेच थांबली नाही.
दोनच दिवसांपूर्वी उभ्या हयातीत आधी काँग्रेसमध्ये नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत भाजपवासी झालेल्या नितीन भरगुडे-पाटील यांच्या निमंत्रणावरून स्व. यशवंतराव चव्हाण यांचे हयातभर अनुयायी राहिलेल्या व आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहून जनतेची सेवा केलेल्या स्व. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला जयकुमार गोरे उपस्थित राहिले. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनी स्व. लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करताना या थोर काँग्रेस नेत्याच्या प्रतिमेखाली कमळाचे चिन्हही लावले.
कार्यक्रमात नितीन भरगुडे-पाटील यांनी तरुण वयाच्या आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन कार्यक्रमाची उंची ‘गगनाला’ नेली. जयकुमार गोरे यांनी याच कार्यक्रमात खंडाळ्याला कोणी एैरा गैरा पाणी देणार नाही, असे कोणतरी बोलले, हेदेखील खरंच आहे. एैरा गैरा पाणी देऊच शकत नाही. कारण ते द्यायचं असतं, तर त्यांनी पाणी प्रश्न कधीच मिटवला असता, त्यामुळे एैरा गैरा कोण हे जनतेला कळाले, असे म्हणत पैरा फेडण्याचे काम सुरूच ठेवले.
एकीकडे गोरे मांढरदेव रस्त्याबाबत भाषण करत असताना दुसरीकडे शिवेंद्रराजे त्याच दिवशी मांढरदेवावर जाऊन काळूबाईची आरती करत होते. मधल्या वेळात जयकुमार गोरे वाई तालुक्यातल्या जांबेतही जाऊन आले. जांब हे किसनवीर कारखान्याचे व्हा. चेअरमन व मकरंदआबांचे सबकुछ प्रमोद शिंदे यांचे गाव. उडतारेच्या दिलीप बाबरांना आधी तिकडे ठेवून पुन्हा इकडे आणलेल्या विराज शिंदेंना, पंचायत समिती सदस्य झालेल्या सुरभिताईंना, विराज शिंदे यांच्या पत्नी ऋतुजा शिंदे यांच्याकडून पराभूत होऊनही मोठ्या मनाने त्यांच्या अभिनंदनाला सहकुटुंब उपस्थित राहिलेल्या दिप्तीताईंना ताकद देत जयकुमार गोरे यांनी वाई मतदारसंघ टार्गेट केल्याचे चित्र दिसले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेची पदे देतानाही जाणीवपूर्वक वाई विधानसभा मतदारसंघातच ऋतुजा शिंदे व ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्या रुपाने दोन सभापती पदे देण्याची खेळी केली.