Satara politics: भाजपकडून 'ऑपरेशन लोटस'

सदस्यांची फोडाफोडी : राष्ट्रवादी-सेेनेच्या तंबूत पळापळ; आज हायहोल्टेज ड्रामा
Satara ZP
Satara ZP Pudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत परिवर्तन करून पहिल्यांदाच भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस राबवले असून, शिवसेनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची फोडाफोडी सुरू केल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या तंबूत खळबळ उडून पळापळ सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सत्ता स्थापनेची मॅजिक फिगर एका सदस्यावर येऊन ठेपल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत हायहोल्टेज ड्रामा दिसणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कमालीचे ॲक्शन मोडवर आल्याने त्यांच्या आक्रमक चालींना पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील प्रत्यक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या लढाईत कसे उत्तर देणार? याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशीच आक्रमक चाली सुरू झाल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फ्रंटफूटवर येऊन भाजपला सत्तेत आणण्यासाठी सूत्रे हातात घेतली आहेत. वाई नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत, फलटण पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जयकुमार गोरे यांनी रणनीती आखली व यशस्वी करून दाखवली तीच रणनीती त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीतही आखल्याचे चित्र गुढीपाडव्या दिवशी दिसले.

निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 तर अपक्ष 1 असे 65 सदस्यांचे बलाबल होते. फर्न हॉटेलमध्ये भाजपच्या झालेल्या बैठकीला अपक्ष 1 धरून 28 सदस्य उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 व शिवसेनेचे 2 सदस्य भाजपने फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला भाजपच्या नेत्यांनीही पुष्टी दिली आहे. त्यामुळे भाजपची संख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या एकत्र आघाडीकडे 33 सदस्य आहेत. बहुमतासाठी 33 सदस्यांचीच आवश्यकता आहे.

रात्री उशिरापर्यंत हे बहुमत राष्ट्रवादी-सेनेकडे असल्याचे सांगितले जात होते. मात्र, भाजपने ऑपरेशन लोटस राबवल्याने अध्यक्ष निवडीपर्यंत भाजपचा बहुमताचा आकडा 33 पार होईल, असे भाजपमधून सांगितले जात आहे. भाजपने घेतलेल्या बैठकीत जयकुमार गोरे यांनी नूतन सदस्यांसमोर बोलताना अध्यक्ष भाजपचाच होईल 18 तास थांबा, असे चार वेळा सांगितले. त्यांची आक्रमक देहबोली पाहता ग्रामविकास मंत्री असलेले जयकुमार गोरे अध्यक्षपद खेचून आणणार असे सांगताना दिसले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानीचे सदस्य मकरंदआबा पाटील व नितीनकाका पाटील यांच्या ताब्यात आहेत तर शिवसेनेचा एक गट वगळता बाकीचे सदस्य शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.

राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन लोटसला थोपवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मकरंद पाटील व शंभूराज देसाई यांनी 33 सदस्य इनटॅक्ट ठेवले तरच ऑपरेशन लोटस थोपवले जाईल, अन्यथा भाजप स्वबळावर सत्तेवर आलेली दिसेल. फोडाफोडीच्या राजकारणाऐवजी महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र जिल्हा परिषदेत जाण्याच्यादृष्टीनेही चर्चा सुरू होती. त्यामुळे अंतिम क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने तीनही पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष नेमण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार. अनेक बैठकांमध्ये मी जिल्हा परिषद सदस्यांना त्याबाबत शब्द दिला आहे. सत्ता स्थापनेसाठी 18 तास राहिले आहेत, तोवर वाट बघा.
- जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news