Satara politics: भाजप-राष्ट्रवादीतच खणाखणी
सातारा : मिनी मंत्रालयावर सत्ता आणण्यासाठी महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी या मित्र पक्षांमध्येच रणकंदण माजले आहे. जिल्हा परिषदेचे 65 गट आणि पंचायत समितीच्या 130 गणांमध्ये राजकीय रणधुमाळीला जोरदार प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीची नेतेमंडळी एकमेकांवरच तोंडसुख घेताना दिसत असून नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही महायुतीचा काडीमोड होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि भाजपचे नेते, राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यात राजकीय बोरीचा बार रंगला असून जिल्हा परिषदेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपशी घरोबा नको, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याने निवडणुकीचे समीकरण कसे असेल, याबाबत उत्सुकता लागली आहे. जिल्ह्यात भाजपविरोधात लढलेला शिवसेना शिंदे गट महापालिकांमध्ये भाजपसोबत गेला आहे, हीच युती एकनाथ शिंदे जिल्ह्यातील नेत्यांना करायला लावणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपावेळी कोपराने खणण्याची व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने राष्ट्रवादी कुणासोबतही युती करण्याच्या मानसिकतेत नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपने जे तंत्र वापरले, तेच तंत्र राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरण्याच्या तयारीत आहे. आमचा बालेकिल्ला अन् आम्ही राज्य करणार, असा नारा राष्ट्रवादीने दिला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर राष्ट्रवादीचा कायमच वरचष्मा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या या ताकदीला सुरुंग लावायचा असेल, तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे भाजप व शिवसेनेचे नेते खासगीत बोलत आहेत. अशावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर शिवसेना-भाजपही एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा तालुक्यात भाजपची ताकद मोठी आहे. खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे यांच्या संघटीत ताकदीमुळे सातारा तालुक्यावर भाजप व महायुतीचा प्रभाव सध्या दिसतो आहे. कराड दक्षिणमध्ये आ. डॉ. अतुल भोसले व ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुस्ती रंगणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पक्ष चिन्हासाठी आग्रही राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. कराड उत्तरमध्ये आ. मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या कार्यकर्त्यांचा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी सामना होणार आहे. माण-खटावमध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना घेरण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना आखली आहे. महाबळेश्वर, वाई, खंडाळा या आपल्या होमग्राऊंडमध्ये ना. मकरंद पाटील यांनी भिरकीट चालवली आहे.
पाटणमध्ये भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर व शिवसेना नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातच पारंपरिक सामना रंगणार आहे. पाटणवर हुकुमत कुणाची? याचा फैसला लवकरच होणार आहे. कोरेगावमध्ये आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यातील सामना पुन्हा रंगणार आहे. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी सुरु केले असल्याने या मतदारसंघात आक्रमक चाली पहायला मिळत आहेत.
सर्वच पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. आता मुलाखतीचा सोपस्कार पार पडणार आहे. फाटाफूट टाळण्यासाठी शेवटच्या क्षण उमेदवारांना एबी फॉर्म दिले जावू शकतात, त्यामुळे बंडखोरांना इतर पक्षांशी पुरस्कृत होण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशीही जिल्ह्यात चर्चा आहे. त्यातूनही बंडखोरी होवू नये, याची काळजी पक्षांचे नेते घेताना पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या बंडखोरांवरच भाजपची नजर आहे.
शहरापुरता मर्यादित असलेला भाजप पक्ष आता गावखेड्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरंपचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने मित्रपक्षांना सोयीस्करपणे दूर ठेवले. जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेत किंवा नगरपंचायतीमध्ये भाजपने फलटण वगळता कुठेही कुणाशीही युती केली नाही. शतप्रतिशत भाजप असे धोरण भाजपने ठेवले होते. या धोरणाला सातारा, वाई, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिकांत भाजपच्या धोरणाला यश आले. आता शहरांतून गावाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपचा गावखेड्याच्या राजकारणात कस लागणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व मदत व पुतर्वसन मंत्री मकरंद पाटील व त्यांचे बंधू खा. नितीन पाटील हे करत आहेत. या दोघांनीही आपले राजकीय कसब पणाला लावले आहे. त्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीआधीच ग्रामीण भागात ज्यांचे वलय आहे, अशा नेत्यांना सोबत घेण्यात त्यांना यश आले आहे. कराड दक्षिणमध्ये ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माणमध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, खटावमध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, रहिमतपूरमधून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल माने या नेत्यांना त्यांनी सोबत घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. आता जिल्हाभर सभा, बैठका घेण्यावर अजित पवार गटाने भर देवून प्रचारात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांना भाजपने हायजॅक केल्याने या पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलेला पहायला मिळतो आहे. देशमुख यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची मोट बांधण्यावर त्यांनी भर दिला असला तरी त्यांना इतर नेत्यांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनही रणजितसिंह देशमुख हे खटाव तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद गटांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

