Jaykumar Gore| चेअरमन पदावर पहिला हक्क भाजपचा

ना. जयकुमार गोरे यांची भूमिका; जिल्हा बँकेतील महायुतीच्या नेत्यांच्या व्यक्तिगत मतांशी असहमत
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Published on: 
Updated on: 

सातारा : जिल्हा बँकेच्या चेअरमनपदावरून महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या असल्याने चेअरमनपदावर सर्वप्रथम भाजपचा अधिकार आहे. बँकेचे चेअरमन पद सर्वात प्रथम भाजपला मिळावे, त्यानंतर महायुतीतील घटक पक्षांना पुढचा कालावधी विभागून द्यावा, अशी स्पष्ट भूमिका ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली. महायुतीतील नेत्यांनी मांडलेल्या व्यक्तिगत मतांशी मी असहमत असल्याचे गोरेंनी ठासून सांगितले.

बँकेची निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून लढवली. मात्र, निवडणुकीनंतर चेअरमनपदावरून घटक पक्षांमध्ये वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यातच भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार संचालक निवडून आल्याने सत्तेतील वाटपाचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. भाजप सर्वाधिक जागांसह मोठा पक्ष ठरल्याने चेअरमनपदावर पहिला दावा आपलाच असल्याचा संदेश ना. गोरे यांनी दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना ना. गोरे म्हणाले, बँकेची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या माध्यमातून लढवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही याबाबत मार्गदर्शन केले होते. महायुतीसंदर्भातील सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर झाल्या असल्याने चेअरमनपदाचा निर्णयही राज्य पातळीवरच होणार आहे. स्थानिक पातळीवर महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेऊन चेअरमनपदाबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर नेत्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाईल. मात्र, भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याने चेअरमनपदाचा पहिला अधिकार भाजपचा आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून पाच वर्षांच्या कालावधीत सर्वप्रथम भाजपला संधी मिळावी आणि त्यानंतर उर्वरित कालावधी महायुतीतील घटक पक्षांना विभागून द्यावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दरेगावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत बँकेच्या चेअरमनपदाबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता ना. गोरे म्हणाले, भाजपच्यावतीने महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करण्याचे अधिकार शिवेंद्रराजे यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी घटक पक्षांशी चर्चा केली आहे. मात्र, दरे येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बँकेच्या विषयावर चर्चा झाली नसावी. अन्य विषयांवर त्यांची चर्चा झाली असावी. शिवेंद्रराजे व आपली अद्याप या विषयावर चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.